कल्याण: काकीनाडा-भावनगर एक्सप्रेसमध्ये लूटपाट करणा-या एका टोळीला एका सतर्क प्रवाशामुळे अटक करण्यात कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच आरोपींमध्ये एका चौदा वर्षीय मुलाचा समावेश आहे. कल्याण रेल्वे न्यायालयाने चार आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून अल्पवयीन आरोपीची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
27 जानेवारीला वसईत राहणा-या जया पिसे ही महिला प्रवासी तिच्या मुलीसोबत सोलापूर ते वसई असा प्रवास काकीनाडा-भावनगर एक्सप्रेमधून करीत होती. गाडी कर्जत ते कल्याण दरम्यान धावत असताना गाडीच्या बोगीत त्यांना काही प्रवाशांचा चोर चोर असा आरडाओरडा ऐकू आला. हा आवाज ऐकून जया त्यांची बॅग जवळ धरून बसल्या असताना पाच जण त्यांच्या जवळ आले. आणि वस्तूने भरलेली त्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. जया यांनी त्यांना प्रतिकार केला असता एकाने चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. यात मोबाईल रोकड असे 7 हजार 600 रूपयांचे सामान होते. याच दरम्यान एका सतर्कप्रवाशाने 100 नंबर वरु न पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. नियंत्रण कक्षातून याची माहीती कल्याण लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलाला दिली गेली. या एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्वरीत लुटमार करणा-या पाच जणांना ताब्यात घेतले. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी थांबल्यावर सर्वाना लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. तरबेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख (सर्व 19 व 20 वर्षे वयोगटातील ) अशी अटक आरोपींची नावे असून अन्य एक आरोपी 14 वर्षाचा आहे. हे पाचही जण पुणे येथील कोंढवा या परिसरातील राहणारे आहेत.
कल्याण रेल्वे न्यायालयात चार जणांना हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी केला आहे का याचा तपास सुरू असल्याची माहीती कल्याण लोहमार्ग महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली. दरम्यान चालत्या मेल एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाला लूटण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.