लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मांसाहारी जेवणवाटपाच्या वादातून मुंबई-नाशिक महामार्गावर खेळणी विकणा-या व्यापा-यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी राजेश सोळंकी (१९), राजेश गोपी भाटी (२५) तसेच राजेश कुंदन भाटी (३२), राजेश ओमी भाटी (२८) आणि जगदीश भाटी (२०) या पाच जणांना कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.माजिवडा भागातील मुंबई-नाशिक राष्टÑीय महामार्गाच्या कडेला टेडी बीयरसह खेळणीविक्रीची काही दुकाने आहेत. हे सर्व विक्रेते एकमेकांचे नातेवाईक आहेत. मूळच्या दिल्ली येथील रहिवासी असलेल्या या विक्रेत्यांपैकी राजेश कुंदन भाटी यांच्याकडे विशाल गोपी भाटी याने गुरुवारी दुपारी जेवण मागितले. त्यावेळी देवीची पूजा झाल्यानंतर जेवण देतो, असे राजेशने सांगितले, तेव्हा विशालने त्यांना शिवीगाळ करून इतरही नातेवाइकांना बोलावून राजेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणा-या विशालचे भाऊ राजेश, बहीण सुमन आणि आई देवली भाटी यांनाही राजेश सोळंकी आणि राजेश भाटी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या झटापटीमध्ये विशालने देवली यांच्या डाव्या हाताला आणि सुमन हिच्या डाव्या दंडावर चावा घेतल्याचा प्रकार १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास घडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे, प्रदीप भानुशाली यांच्या पथकाने राजेश सोळंकीसह दोघांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे. यातील विशाल आणि कालिया सोळंकी हे दोघे पसार आहेत.याच प्रकरणात दुस-या गटाने दिलेल्या तक्रारीनुसार राजेश गोपी भाटी यांचा भाऊ विशाल हा राजेश भाटी याच्याकडे जेवण मागण्यासाठी गेला असता, त्यांनी विशाल याला शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा त्याने कुटुंबीयांना बोलावल्यानंतर त्याला तिघांनी मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी राजेश कुंदन भाटी, राजेश ओमी भाटी आणि जगदीश भाटी या तिघांना १९ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास अटक केली. या तिघांनाही २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.