दिल्ली एनसीआरमध्ये गुन्हेगारीविरोधात पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील कौशांबी भागात डॉलर देण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत, जेणेकरून सूत्रधारालाही अटक करता येईल.
पोलिस उपायुक्त (ट्रान्स हिंडन) निमिष पाटील यांनी सांगितलं की, पोलिसांनी साबिर, अब्दुल रहीम, अमन, नवीन शेख आणि रुखसाना या बांगलादेशी नागरिकांना कौशांबी परिसरात अटक केली आहे. त्यांच्याकडून अमेरिकन डॉलरचे पाच बनावट बंडल, पाच आधार कार्ड, तीन पॅन कार्ड, 17 सिम कार्ड आणि 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त केल्यानंतर सायबर फसवणुकीचीही शक्यता वर्तवली जात आहे. सायबर फसवणुकीतही आरोपींचा सहभाग होता की नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यापूर्वी या बांगलादेशी नागरिकांना तपासादरम्यान संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान पोलिसांना त्यांच्याकडून काही बंडल सापडले. ते कोऱ्या कागदांचे बंडल होते ज्यात वर आणि खाली डॉलर्स ठेवलेले होते. ही टोळी निरपराध लोकांना अर्ध्या किमतीत डॉलर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
कौशांबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोआपूर गावात ते भाड्याच्या खोलीत राहत होते. या टोळीने विविध शहरात 100 हून अधिक लोकांना फसवलं आहे. पाटील म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या कागदपत्रांची वैधताही पोलीस तपासत असून ते कोणत्या आधारावर भारतात राहत आहेत याचाही शोध घेत आहेत.