ठाणे - पंचधातूंची वराहअवताराची बारामुखी भगवान विष्णु आणि लक्ष्मीच्या मूर्तीची पाच कोटींमध्ये विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि रायगड जिल्हयातील मांडवी सागरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून आठ किलो 700 ग्रॅम वजनाची भगवान विष्णुची आणि सहा किलो 827 ग्रॅम वजनाची लक्ष्मीची अशा दोन मूर्ती हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणूकीच्या गुन्हयातील फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे आपल्या पथकासह रायगड जिल्हयातील अलिबाग येथे 21 सप्टेंबर 2019 रोजी गेले होते. यातील आरोपीचा शोध घेत असताना पुरातन मौल्यवान मूर्ती विक्रीसाठी काही व्यक्ती अलिबाग येथील गोकुळ ढाबा सारळपूल येथे येणार असल्याची ‘टीप’ बागूल यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी स्थानिक मांडवा पोलीस ठाण्याची मदत घेउन संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार युनिट एकच्या पथकासह मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने अलिबागच्या सारळपूल येथे संयुक्तरित्या सापळा रचून एका सफेद रंगाच्या कारमधून आलेल्या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एक मुंबईचा (मुळ रा. कलकत्ता), तर इतर दोघे हे स्थानिक रहिवाशी आहेत. त्यांच्या कारच्या डिक्कीतील बॅगेतून बारामुखी भगवान विष्णुची आणि लक्ष्मीची मूर्ती जप्त करण्यात आली. या मूर्तीबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. मुंबईतील भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून 23 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. पुरातत्व विभागाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी अलिबाग येथे गुन्हा दाखल होणार आहे.