नवी दिल्ली - बिहारच्या (Bihar) चंपारणमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका रहस्यमयी आजारामुळे तीन दिवसात घरातील एक एक करीत सर्वांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मोतिहारीमधील मुफ्फसिल पोलीस ठाणे हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सातत्याने होत असलेल्या मृत्यूच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी शनिवारी मोतिहारी पकडीदयाल मार्ग काही वेळासाठी रोखून धरला होता. मात्र डॉक्टरांनी समजवल्यानंतर लोक शांत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात दहशत पसरली आहे. डॉक्टर श्रवण पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसात पाच आणि गेल्या सहा महिन्यात या कुटुंबातील 8 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या कुटुंबाच्या घराच्या मागे एक भलमोठं झाड होतं. जे सहा महिन्यांपूर्वी पडलं होतं. कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं की, त्यानंतर या घरात मृत्यूच्या घटना सुरू झाल्या आहेत.
मृतदेहांच्या नाका-तोंडातून येत होता फेस
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, झाड पडल्यानंतर कुटुंबीय भुताचा काहीतरी परिणाम आहे असं मानून तांत्रिकाकडे गेले आणि त्याच्याकडून उपचार करू लागले. डॉक्टर श्रवण पासवान यांनी सांगितलं की, आज झालेल्या मृत्यू प्रकरणातील मृतदेहांच्या नाका-तोंडातून फेस येत होता आणि एका मृतदेहाच्या कानातून रक्त निघत होता. सर्पदंश किंवा विष घेतल्यामुळे असं झाल्याची शक्यता आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर याबाबत नेमका खुलासा होईल असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
गेल्या सहा महिन्यांत 8 लोकांचा मृत्यू
डॉक्टरांनी सांगितलं की, महासाथीच्या तज्ज्ञांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ते मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे. मृत व्यक्तीचं कुटुंबीय सीता देवा आणि सरिता देवी यांनी सांगितलं की, पोटदुखीनंतर गळ्यात वेदनाच्या तक्रारी जाणवत होत्या, त्यानंतर काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. मृत प्रियांशचे वडील राकेश प्रसाद यांनी सांगितलं की, गेल्या सहा महिन्यांत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच य़ा प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.