जळगाव : राजीव गांधी नगरातील राहूल प्रल्हाद सकट (२५) याच्या खून प्रकरणात सत्यासिंग मायासिंग बावरी, रवीसिंग मायासिंग बावरी (२७), मलींगसिंग मायासिंग बावरी (२५), मालाबाई मायासिंग बावरी (६३) व कालीबाई सत्यासिंग बावरी (४३) सर्व रा.राजीव गांधी नगर या पाच जणांना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, १२ जुलै रोजी २०१७ रोजी रात्री अकरा वाजता किरकोळ कारणावरुन सकट व बावरी कुटुंबात राजीव गांधी नगरात वाद झाला होता. यात राहूल याच्या पोटात चॉपर खुपसून गंभीर जखमी केले होते. मूत्रपिंडालाही इजा झाली होती. मुंबईला नेत असतानाच राहूल याचा नाशिकजवळ मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बावरी कुटुंबियाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यातील सत्यासिंग, मलींगसिंग व रवीसिंग गुन्हा घडल्यापासून कारागृहात आहेत तर मालाबाई व कालीबाई या दोघं जामीनावर होत्या. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक बापू रोहोम,उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे,उपनिरीक्षक राजेश घोळवे, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी व शरद पाटील या गुन्ह्याचा तपास करुन सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.