अमरावती: एका तरूणाला एक्सप्रेस हायवेवर चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या पाच जणांना जेरबंद करण्यात आले. घटनेच्या पाच महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. गाडगेनगर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी शनिवारी दिली. पत्रपरिषदेला सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले उपस्थित होते.
याप्रकरणी अवेस खान ऊर्फ कालु नासिर खान (२०, रा. सहारानगर), मोहम्मद सुफीयान ऊर्फ गोलू मोहम्मद मन्नान (२०), शोएब खान ऊर्फ शोएब दिल्ली वहिद खान (२४), शेख राजा ऊर्फ लग्गी शेख आरीफ (२१, तिघेही रा. अन्सारनगर), शेख रिझवान शेख महबुब (१९, रा. सुफीयाननगर) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे पाच मोबाईल, जबरी चोरीतील १६ ग्रॅम सोन्याचे दागिने ९० हजार रुपये, एक दुचाकी असा एकुण १ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाचही आरोपींनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात २८ ऑगस्ट २०२२ रोजी नोंद असलेल्या लुटमारीसह अन्य तीन गुन्ह्यांची कबुुली दिली आहे. यातील मो. सुफियान, शोएब खान व शेख राजा यांच्याविरूद्ध शहर आयुक्तालयातील ठाण्यांसह नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत.
अशी होती घटना-
कारंजालाड येथील सौरभ वाहुरवाघ (१९) हा २८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १० च्या सुमारास दुचाकीने एक्सप्रेस हायवेकडे जात असताना जुना जकात नाक्याजवळ एका २२ ते २३ वर्ष वयाच्या तरूणाने त्याला हात दाखवून थांबविले. त्याचवेळी कहा जा रहा है, अशी विचारणा करून त्या तरूणाने साैरभच्या कानावर बुक्की मारली. तेवढ्यात त्याच वयाची अन्य दोन मुले आली. पैकी एकाने सौरभवर चाकु उगारला. मात्र दुसऱ्याने त्याला थांबवत सौरभकडील मोबाईल, हेडफोन असा ९६०० रुपयांचा एैवज चाकूच्या धाकावर लुटला. तिघेही रस्त्यालगतच्या जंगलात निघून गेले होते.
तांत्रिक विश्लेषणाने केली उकल-
एसीपी पुनम पाटील यांच्या नेेतृत्वात ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या ‘टिम गाडगेनगर’मधील एपीआय महेश इंगोले, अंमलदार इशय खांडे, निळकंठ गवई, गजानन बरडे, आस्तिक देशमुख, गणेश तंवर, सचीन बोरकर, मो. परवेज, उमेश भोपते, मो.समीर, जयसेन वानखडे, प्रकाश किल्लेकर, सागर धरमकर, सुशांत प्रधान, राज देविकर, मनिष निशिबकर यांच्यासह सायबरच्या ठाणेदार सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे यांनी ही कारवाई केली. मोबाईल सीडीआर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुरक ठरला.