नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून अपहृत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. या प्रकरणी त्यांना फूस लावून पळवून नेणाऱ्यांनाही अटक झाली आहे. त्यामध्ये चार वर्षांपासून बेपत्ता मुलाचाही शोध लागला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तपास करत होते. त्याकरिता उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांनी तपास पथके तयार केली होती. या पथकाने दहा दिवसांत पाच गुन्ह्यांचा उलगडा करून अपहरण झालेल्या मुलांची सुटका केली आहे. त्यामध्ये चार अल्पवयीन मुलींचा तर एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तळोजा येथून दहा वर्षांचा मुलगा मागील चार वर्षांपासून बेपत्ता होता. त्याच्याविषयी राज्यात व राज्याबाहेर चौकशी करताना, कर्नाटकच्या उडपी येथे तो असल्याची माहिती समोर आली. यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणावरून त्याला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर तळोजा, खांदेश्वर, कोपरखैरणे व खारघर येथून बेपत्ता असलेल्या चार अल्पवयीन मुलींना पुणे, मुंबई, सातारा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मानखुर्दच्या मुंचुर ठाकूर या महिलेसह, तळोजाचा अजय पांडे, खान्देश्वरच्या रवी मोरे यांना पोलिसांनी अटक केली.
पाच अल्पवयीन बालकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:52 AM