पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पुणे लोहमार्ग पोलिसांनीअटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चाकु, एक स्टीलचा रॉड, दोरी, मिरची पुड जप्त केली. योगेश विश्वासराव पाचडे (वय ३०), शिवा गुलाबराव वानखेडे (वय २२), आशिष श्रीकृष्ण कानपुरे (वय २३, तिघे रा. राजन्दा, जि. अकोला), आकाश अंबादास राजगुरू (वय २४, रा. पिंपरी, जि. बीड), पंकज मुन्ना यादव (वय १९, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सुदर्शन केशव इप्पर यांनी फिर्याद दिली आहे. १९ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वाडीया पुलाखाली ही घटना घडली. वाडीया पुलाखाली काही जण असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती इप्पर यांना मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईमध्ये पुलाखाली सहा जण मिळून आले. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पाच जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्यांच्यावर गुन्हे दाखल असून त्याबाबत तपास करण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 8:55 PM