मुरलीधर भवार, डाेंबिवली: दिवा वसई रेल्वे मार्गावरील ज्यूचंद्र रेल्वे स्थानकानजीक असलेल्या फाटकात रेल्वे रुळाचे काम सुरु हाेते. यावेळी रेल्वे गेटमनला जबरदस्तीने गेट उघडण्यास सांगून गाेंधळ घातला. रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानाला मारहाण केल्या प्रकरणी डाेंबिवली रेल्वे पाेलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे रोहित विश्वकर्मा, साजन सिंग, गौरव सिंग, संतोष यादव, विल्सन डिसोजा अशी आहेत. या पाचही जणांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
२६ जानेवारी रोजी रात्री १ ते ४ वाजताच्या सुमारास दिवा वसई रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकांमधील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच सुमारास पाच ते सात अज्ञात इसम या ठिकाणी आले. त्यांनी रेल्वे फाटक उघडण्याचे गेटमनला सांगितले. मात्र गेटमॅनने दुरुस्ती सुरू असल्याने गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे या पाच ते सात जणांनी रेल्वे रुळावरच ठिय्या मांडत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रेल्वे रुळावरच त्यांनी स्वतःच्या गाड्या देखील उभ्या केल्या. या पाच ते सात जणांची समजूत काढण्यात गेलेल्या रेल्वे कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्याला गोंधळ घालणाऱ्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत मारहाण केली. सुमारे २ तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. अखेर या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पाेलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
या प्रकरणातील आणखी एक महिला आणि पुरुष आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.