रायगड : खवल्या मांजरांच्या खवल्यांची बेकायदा तस्करी करणार्या 5 जणांना पनवेल आणि अलिबाग वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची खवले हस्तगत करण्यात यश आले आहेअशी माहिती पनवेलचे सहाय्यक वन संरक्षक ज्ञानेश्वर सोनावणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या सर्वांना पनवेल प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहिती अलिबागचे उपवनसंरक्षक विभागाला मिळाली होती. संयुक्त पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील चिंचवण गावच्या हद्दीत असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ सापळा लावून कारवाई केली. एकमेकांच्या पिशव्या अदलाबदल करत असताना वन विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकली. यावेळी दोघेजण त्यांच्या हाती सापडले तर एकजण पळून जात असताना पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. या तिघांकडे खवले मांजराचे खवले होते. ते वन कर्मचार्यांनी जप्त केले. तिघांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा नोंद केला.
चौकशीत त्यांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन व्यक्तींची माहिती दिली. त्यानुसार दोघांना राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. वन्यप्राण्याच्या खवल्यांनी भरलेली बॅग ज्या ठिकाणी टाकली होती,त्या जागेवरून 3 किलो खवले मांजराचे खवले जप्त करण्यात आले.