पिंपरी : एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चारचाकी मोटारसह २ पिस्टल, ३ जिवंत राऊंड, कोयता, स्टील रॉड हस्तगत करण्यात आला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. पाचही आरोपींवर अनेक पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश बापु शिंदे (वय ३२, रा. वाकड, मुळगाव श्रीरामपूर, जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवने (वय २९, रा. वाकड), भैय्या उर्फ सचिन बबन जानकर (वय २६, रा. वाकड), नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय ३२, रा. वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय ३०, रा. वाकड, मुळगाव रामेश्वर वस्ती, ता. भुम, जि. उस्मानाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना बातमीमार्फत बातमी मिळाली की, काही जण काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकणार असून त्यांच्याकडे पिस्टल व कोयत्यासारखी घातक हत्यारे आहेत. त्यानुसार काळेवाडी येथील बीआराटी रस्त्याच्या कडेला चारचाकी मोटारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे २ लोखंडी पिस्टल, ३ जीवंत राऊंड, लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, स्टील रॉड, ५ मोबाईल हॅन्डसेट व चारचाकी मोटार (क्र. एमएच १४ सीके ११६१) असा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपी दुर्गेश शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०११ पासून जबरी चोरी, घरफोडी चोरी तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे इत्यादी असे ९ गुन्हे दाखल आहेत.आरोपी भैय्या उर्फ सचिन जानकर वाकड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१५ पासून गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा करणे, असे ५ गुन्हे दाखल आहेत.आरोपी नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे याच्यावर कोथरुड व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी रामकृष्ण सोमनाथ सानप याच्यावर भूम व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रमोद संजय सवने याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरिश माने, सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दीपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांनी कारवाई केली.
दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच सराईत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 4:58 PM
एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले.
ठळक मुद्देवाकड पोलिसांची कारवाई : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी