ठाणे : आपल्याच पत्नीच्या हत्येसाठी पाच हजारांची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणल्याचा प्रकार ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे घडला होता. या खुनातील एक आरोपी शंभू मनुभाई रावल (४६, रा. गवाडा, जि. मेहसाना, गुजरात) याला तब्बल २० वर्षांनी गुजरात राज्यातील मेहसाना जिल्ह्यातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने कुंदा (३५) या महिलेची हत्या केली होती.
ठाण्यातील वागळे इस्टेट, रघुनाथनगर भागात राहणारी कुंदा आणि तिचा पती कुंदन रावल यांच्यात नेहमीच खटके उडत होते. या नेहमीच्या भांडणाला कंटाळून कुंदन याने आपल्याच पत्नीची हत्या करण्यासाठी शंभू आणि सुरेश मनीलाल नाव्ही या दोघांना पाच हजार रु पयांची सुपारी २००० मध्ये दिली होती. त्यानंतर, दोघांनी मिळून कुंदाची हत्या करून पलायन केले होते. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दोघेही आरोपी गेली २० वर्षे फरार होते. दरम्यान, आरोपी शंभू रावल हा त्याच्या गुजरात राज्यातील मूळ गावी वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती.
त्यानुसार, युनिट-१ चे सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आणि उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांच्या पथकाने गुजरात पोलिसांच्या मदतीने शंभू याला १५ ऑक्टोबर रोजी गवाडा (जि. मेहसाना) येथून ताब्यात घेतले. याच खुनातील दुसरा आरोपी सुरेश मनीलाल नाव्ही हा मात्र ५ डिसेंबर २०१५ रोजी मृत पावल्याची माहिती चौकशीमध्ये त्याने या पथकाला दिली.