राम शिनगारे, छत्रपती संभाजीनगर: मृत मामाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून दागिन्यांसह इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ४८ तासाच्या आत पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा शोध घेतला. घरफोडीनंतर मुंबईला पळून गेलेला चोरटा शहरात परत येताच मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
भिमा बबन साळवे (रा. मुकुंदवाडी) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मुकुंदवाडीचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर २ जुलैच्या रात्री सराईत गुन्हेगार भिमा साळवे याने फोडून घरातील सोन्याचे कानातील दागिने, होम थेअटर, मोबाईल, रिक्षाच्या बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. या प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर विशेष पथकाचे उपनिरीक्षक पंकज मोरे यांच्या पथकाला साळवे यानेच चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. साळवे याच्याविषयी माहिती घेतल्यानंतर चोरी केल्यानंतर त्याने मुंबई गाठल्याचे स्पष्ट झाले. ५ जुलै रोजी तो मुंबईहुन शहरात परत आल्याची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांच्या पथकाने त्यास बेड्या ठोकल्या.
सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चाेरीची कबुली दिली. तसेच चोरलेला मुद्देमालही काढुन दिला. पोलिसांनी त्याच्याकडून एकुण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गोरे, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अनिल थोरे, गणेश वाघ, अनिल कोमटवार, सुभाष राठोड, दिनेश राठोड, योगेश बावस्कर यांच्या पथकाने केली.