ठाणे : होळीनिमित्त मद्यपार्टीसाठी पैसे न दिल्याने ठाणे महापालिकेतील पाणी खात्यातील सोमेश्वर फोपाल (२४) याने अरविंद गिरी (२७, रा. गांधीनगर, ठाणे) या खासगी बसवरील क्लीनरच्या कानाचा लचका तोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी गांधीनगर भागात घडली. या प्रकरणी सोमेश्वर आणि त्याचा साथीदार पंकज इंगळे (२८) या दोघांनाही चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. तर कानाचा तुकडा पडल्याने गिरी यांना तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे.
पोखरण रोड क्रमांक दोन हनुमान मंदिराजवळील सिद्धांचल इमारतीसमोर १० मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यातील कंत्राटी कामगार सोमेश्वर आणि पंकज हे दोघे जण आले. त्यांनी गांधीनगर चौकी येथून खासगी बस धुण्यासाठी नेहमी पाणी घेणारे तसेच त्या ठिकाणी बस उभे करणाऱ्या गिरी यांच्याकडे होळीच्या पार्टीसाठी काही पैशांची मागणी केली. तुम्ही बस धुण्यासाठी नेहमी पाणी घेता, आता होळी साजरी करण्यासाठी पैसे द्या, असे त्यांनी गिरी यांना बजावले. पैसे देण्यास त्यांनी विरोध केला. याचाच राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या सोमेश्वर याने शिवीगाळ करून त्यांच्याशी बाचाबाची केली. याच झटापटीत त्याने गिरी यांच्या उजव्या कानाला चावा केला. हा चावा इतका जोरदार होता की, यात त्यांच्या कानाचा अक्षरश: तुकडा पडला. यात गंभीर जखमी झालेल्या गिरी यांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.