इंदूर : इंदूरच्या खजराना पोलिसांनी (Khajrana police) फसवणूक प्रकरणी फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला (Flipkart delivery boy fraud) अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने आतापर्यंत जवळपास 10 जणांच्या ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली बुकिंग रद्द करून फसवणूक केली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आरोपीकडून अजून बऱ्याच फसवणुकीच्या प्रकरणांचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेला आरोपी ऑर्डर रद्द करून मोबाइलची हेराफेरी करत होता. दरम्यान, आरोपी तोच मोबाइल त्याच व्यक्तीला रोख रक्कम घेऊन देत होता. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे.
अशीच एक ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी खजराना पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय दीपक राजपूतला अटक केली आहे. दीपक अतिशय हुशारीने लोकांची फसवणूक करत होता. दरम्यान, दीपक ऑनलाइन खरेदी केलेल्या महागड्या मोबाइलच्या ऑर्डर रद्द करायचा आणि ग्राहकाला फोन करून आपल्याकडून मोबाइल देतो, असे सांगत होता. त्यानंतर तो ग्राहकाकडून पैसे आपल्या खात्यात ट्रान्सफर करायचा किंवा रोख रक्कम घेत होता.
दरम्यान, या आरोपीकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्याचबरोबर, अनेक मोबाइल कंपन्यांचा स्टॉकमधून गायब आहेत. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून त्यात अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांची फसवणूक बनवण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही शहरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. याप्रकरणी इंदूर पोलिसांनी पकडलेल्या तरुणाची चौकशी करून संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहे.