भोपाळ: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये फ्लिपकार्टला मोठा आर्थिक फटका बसला आहे. माजी कर्मचाऱ्यानं कंपनीला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पेशानं इंजिनीयर असलेल्या माजी कर्मचाऱ्यानं फ्लिपकार्टमधून खरे एअरपॉड्स मागवून बोगस एअरपॉड्स परत केले. यामध्ये फ्लिपकार्टच्या कुरिअर कंपनीचा डिलेव्हरी बॉय त्याची मदत करायचा.
या प्रकरणी ऍपल कंपनीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी फ्लिपकार्टचा माजी कर्मचारी शुभम मिश्रा आणि त्याचा मित्र अंकित रैकवारला अटक केली. त्यासोबतच शुभमकडून एअरपॉड्स खरेदी करणारा दुकानदार कैलाश आसवानीलादेखील बेड्या ठोकल्या.
ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं जबलपूर पोलिसांकडे एक विचित्र तक्रार दाखल केली होती. जबलपूरमध्ये कंपनीनं महागडे एअरपॉड्स डिलिव्हरसाठी पाठवल्यावर त्याची डिलिव्हरी होत नाही. ते पुन्हा परत येतात. मात्र त्यात बोगस एअरपॉड्स असतात. ते एअरपॉड्स खऱ्याखुऱ्या एअरपॉड्स सारखेच दिसतात.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. या सगळ्या मागचा मास्टरमाईंड फ्लिपकार्टचाच माजी कर्मचारी असल्याचं तपासातून समोर आलं. शुभम मिश्रानं अत्यंत चलाखीनं फ्लिपकार्टला गंडवलं. फ्लिपकार्टचा डिलिव्हरी एजंट असलेला मित्र अंकित रैकवारला शुभमनं यामध्ये सहभागी करून घेतलं.
शुभम वेगवेगळ्या नंबरवरून एअरपॉड्स मागवायचा. एअरपॉड्सच्या डिलिव्हरीची जबाबदारी अंकितची असायची. अंकित पार्सल घेऊन आल्यावर शुभम त्यातले खरे एअरपॉड्स काढून घ्यायचा आणि त्यात बोगस एअरपॉड्स ठेवायचा. त्यानंतर अंकित पार्सलची नोंद अनडिलिव्हर्ड म्हणून करायचा आणि ते पुन्हा फ्लिपकार्टकडे पाठवायचा. त्यानंतर शुभम खरे एअरपॉड्स दुकानदार कैलाश आसवानींना विकायचा. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे ५ लाख किमतीचे १९ एअरपॉड्स जप्त करण्यात आले आहेत.