मुंबई : ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयवर एम.एच.बी. कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलिव्हरी केलेल्या पार्सलचे जवळपास सव्वालाख रुपये त्याने लंपास केल्याचा आरोप त्याच्यावर असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.तक्रारदार अभिषेक साईल (३३) हे या कंपनीत व्यवस्थापक असून बोरीवली पश्चिमेतील जयराजनगरमध्ये त्यांचे ऑफिस आहे. त्यांच्याकडे काम करत असलेल्या ७० डिलिव्हरी बॉयपैकी शैलेश दिघसकर नावाचा एक तरुण वर्षभरापासून त्यांच्याकडे काम करत आहेत. साईल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता तो कामावर आला आणि त्यांनी एकूण १५ पार्सल कॅश ऑन डिलिव्हरीचे घेतले. ते सर्वत्र देऊन आल्यानंतर त्यांनी पार्सल बॅग ऑफिसला ठेवली आणि घरी जाऊन जेवण करून येतो म्हणून सांगितले आणि परतलाच नाही.
ही बाब टीम लीडर रवींद्र धुरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने शैलेशला फोन करत पैसे जमा न केल्याबाबत जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानुसार याप्रकरणी कंपनीने पोलिसांत धाव घेत शैलेशविरोधात गुन्हा दाखल केला.