लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो करत दिवसाला हजारो रुपये कमावण्याची फसवी ऑफर बोरिवलीतील एका महिला व्यावसायिकाला देण्यात आली. या ऑफरद्वारे तब्बल ९ लाखांचा चुना लावला. तिने बोरिवली पोलिसात तक्रार दिल्यावर तपास सुरू आहे.
बोरिवलीत राहणाऱ्या तुलसी (४०) यांना ९ फेब्रुवारी रोजी एक मेसेज मिळाला ज्यात थिंग पीपल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीची एचआर मॅनेजर म्हणवत नोकरी शोधत आहात का? असे विचारले.दोन सेलिब्रिटींना फॉलो केले तरी २१० रुपये असे दिवसाला दीड हजार ते तीन हजार रुपये मिळण्याची संधी दाखविण्यात आली. त्यानुसार तुळशींनी इंस्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटींना फॉलो केले. या पूर्ण केलेल्या टास्कच्या पैशांसाठी टेलीग्रामवर संपर्क करत त्यांना PTK20904 हा कोड शेअर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना THINK PEOPLE JO8 या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. सेलिब्रिटींना इंस्टाग्रामवर फॉलो करण्याचे त्यांना ४ ते ५ टास्क व एक प्रीपेड (क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक) टास्क दिली जायची. जी पूर्ण न केल्यास पैसे न देता काम बंद करण्याचे सांगितले जायचे. तुलसी यांना अंकित सिंग नामक इसम स्टेप शिकवायचा. त्यानंतर तुलसी यांनी भरलेल्या अडीच हजारांच्या बदल्यात ३ हजार ४१० रुपये पाठवण्यात आले; पुढे क्रिप्टो करन्सीच्या वॉलेटमध्ये रक्कम टाकली जायची; ती काढल्यास क्रेडिट स्कोर कमी होईल व टॅक्स लागतील अशी कारणे जायची.
...आणि गुन्हा दाखलजवळपास ९ लाख ४५ हजार ७९८ रुपये तुलसी यांनी विविध खात्यावर भरले; मात्र पैशाची विचारणा वारंवार केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत अखेर त्यांच्या टेलिग्राम ग्रुपमधून काढून टाकत त्याची हिस्ट्री चाटही डिलीट केली. ही फसवणूक लक्षात आल्यावर त्यांनी बोरवली पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.