उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कट रचून आधी लग्न केलं आणि नंतर विम्याचे पैसे हडपण्यासाठी पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस उपायुक्त शशांक सिंह यांनी बुधवारी सांगितलं की, चिनहट पोलीस स्टेशन क्षेत्रातील कंचनपूर मटियारी येथील रहिवासी असलेल्या अभिषेकने कट रचून एप्रिल २०२२ मध्ये मटियारी भागातील राधापुरम येथील रहिवासी पूजा यादव हिच्याशी लग्न केलं.
लग्नानंतर अभिषेकने बनावट कागदपत्रांच्या आधारे तिचा ५० लाखांचा विमा काढला. तसेच तिच्या नावावर १० लाख रुपयांचं मुद्रा लोन घेतलं, हप्त्यांवर सहा वाहनं खरेदी केली. विम्याची रक्कम हडपण्यासाठी आणि वाहनांचा हप्ता टाळण्यासाठी २० मे २०२३ रोजी त्याच्या साथीदारांच्या मदतीने पूजाची कारने चिरडून हत्या केली.
विमा रकमेवर दावा केल्यानंतर विमा कंपनीला संशय आला आणि त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि संपूर्ण सत्य बाहेर आलं. मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत कुलदीप सिंह, आलोक निगम आणि दीपक वर्मा या तीन आरोपींना अटक केली. पूजाचा पती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक, त्याचे वडील राम मिलन आणि अभिषेक शुक्ला नावाच्या आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
शशांक सिंह यांनी सांगितलं की, हे संपूर्ण प्रकरण एका मोठ्या कटाशी संबंधित आहे. त्यांच्या प्लॅन अंतर्गत अभिषेकने एप्रिल २०२२ मध्ये पूजासोबत लग्न केलं होतं. हे त्याचं दुसरं लग्न होतं. त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आणि लग्नानंतर काही महिन्यांतच पूजाचा ५० लाखांचा विमा काढला. तिच्या नावावर 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'अंतर्गत दहा लाख रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. पूजाच्या नावावर चार कार आणि दोन बाईक हप्त्यावर घेतल्या. नंतर विम्याची रक्कम हडप करण्यासाठी आणि वाहनांचे हप्ते भरावे लागू नयेत म्हणून आरोपींनी पूजाची हत्या करण्याचा आणखी एक कट रचला.
अभिषेक आणि त्याचे वडील राम मिलन यांनी कट रचल्याचं सांगितलं. त्यात आलोक निगम, कुलदीप सिंह, अभिषेक शुक्ला आणि दीपक वर्मा यांचाही समावेश होता. २० मे २०२३ रोजी घटनेच्या दिवशी राम मिलनने पूजाला औषध देण्याच्या बहाण्याने बाहेर आणलं. अभिषेक शुक्लाने पूजाला त्याच्या कारने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी दीपक वर्मा याला घटनास्थळावरून पकडलं होतं. मात्र आता हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.