पुणे : महिलेला मोबाइलमध्ये ‘लोन ॲप’ डाउनलोड करायला सांगितले. मात्र तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन १ लाख ११ हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंगळुरू येथील ९ जणांना अटक करण्यात आली. ‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे.
विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बारायडू, आकाश एम. व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस., दीपिका एल. (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात खंडणी, फसवणूक, अब्रुनुकसानी, धमकावणे आदी विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तीस वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी ते १० जून या कालावधीत ऑनलाइन स्वरुपात घडला. या प्रकरणाचा तपास करून सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून नऊ आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले. आरोपींनी या महिलेच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे व माहिती चोरली. त्यानंतर ही छायाचित्रे मॉर्फ करत त्यावर बदनामीकारक संदेश लिहून संपर्क यादीतील लोकांना पाठवित महिलेला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे. न्यायालयाने या नऊ जणांना सात ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
‘लोन ॲप’चा वापर करून गुन्हा करणाऱ्या टोळीत आरोपींचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्याकडे हजारो जणांचा डेटा सापडला आहे. या सर्व लोकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याची शक्यता आहे. या आरोपींना डाटा व तांत्रिक मदत करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी विविध व्हॉट्सॲप क्रमांकावरून पीडितेला धमकावत विविध राज्यातील बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे.
या आरोपींना सीमकार्ड व बँक खाती कोणी पुरवली याची चौकशी करायची आहे. आरोपींनी उकळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करून खंडणीची रक्कम हस्तगत करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
बनावट कॉल सेंटरमधून खंडणीची मागणीआरोपी बंगळुरूमध्ये बनावट कॉल सेंटर चालवत होते. ‘लोन ॲप’ डाउनलोड करणाऱ्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रांसह माहितीचा आरोपी वापर करायचे. त्यानंतर पीडित व्यक्तींना बनावट व्हॉट्सअप व इतर मोबाइल क्रमांकाद्वारे धमकावायचे. पीडित व्यक्तींबद्दलचा बदनामीकारक संदेश त्यांच्या संपर्क यादीतील लोकांना पाठविण्याची धमकी देऊन कर्जाची रक्कम व्याजासहित परत करण्याच्या नावाखाली खंडणीची मागणी करत होते, असे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.