लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकाच ठिकाणी राहत असताना ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमातूनच बंधने वाढली. जीन्स घालण्यावरून वाद सुरू झाला. पुढे प्रेयसीने सोबत राहण्यास नकार देताच चाकूच्या धाकात तिला लग्नासाठी तयार केले. लग्नाच्या काही वर्षांत पतीच्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून तरुणीने आयुष्य संपविल्याची घटना धारावीत घडली. आत्महत्येपूर्वी तरुणीने भावाला व्हॉट्सअॅप करून, पतीलाही ध्वनिफीत पाठविल्याचे समोर आले. त्यानुसार, पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
माटुंगा लेबर कॅम्प येथे राहणाऱ्या नेहाचे (नावात बदल) २०१२ मध्ये इमारतीत राहणाºया रफिक मियो (३३) सोबत ओळख झाली. त्याच ओळखीतून संवाद वाढला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकले. याच दरम्यान रफिकच्या संशयी वृत्तीमुळे दोघांमध्ये खटके उडू लागले. २०१६ मध्ये याबाबत घरच्यांना समजताच त्यांनीही रफिकची समजूत काढली. मात्र, रफिक ऐकण्यास तयार नव्हता. पुढे चाकूच्या धाकात लग्नासाठी गळ घालण्यास सुरुवात केली. माझी नाही तर कुणाचीच नाही, म्हणून त्याने तिला त्रास देणे सुरूच ठेवले.
अखेर, लग्नानंतर सुधारेल, या आशेने त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच ती गरोदर राहिली. रफिककडून काळजी घेण्याऐवजी मारहाण सुरू झाली. बाळ झाले, तरीदेखील रफिकचा अत्याचार कमी झाला नाही. याच दरम्यान २३ मार्च, २०१९ रोजी नेहाने भावाला संदेश पाठवून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आणि आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी मुलीची समजूत काढून रफिकला समजावले. पुढे १४ जून रोजी पुन्हा नेहाने भावाला व्हॉट्सअॅपवर संदेश धाडला. त्यात, ‘रफिकमुळेमी खूप त्रासलेली असून, मला आत्महत्या करण्याकरिता रफिक भाग पाडत आहे. मी आत्महत्या केल्यास त्यास पूर्णत: रफिक जबाबदार असून, मी मेल्यानंतर माझा चेहरा रफिकला दाखवू नका व मुलास रफिककडे पाठवू नका,’ अशा आशयाचा मजकूर पाठवला.
कुटुंबीयांनीही तेव्हाही मुलीची समजूत काढली. पुढे ३० जानेवारी रोजी तिने तीन ध्वनिफीत तयार करून रफिकला पाठविल्या. या घटनांनतर रविवारी नेहाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.भावाने दिली तक्रार!आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी मोबाइल ताब्यात घेताच, त्यात या ध्वनिफीत मिळून आल्या. त्यानुसार, रफिकच्या अत्याचाराला कंटाळून नेहाने हे पाऊल उचलल्याची तक्रार तिच्या भावाने दिली आहे. त्यानुसार, रफिकविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत, शाहूनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.