नालासोपारा (मंगेश कराळे) :- दुचाकी चोरून त्याद्वारे जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला गुजरातच्या वापी येथून शनिवारी पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी रविवारी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयातील वसई विरार परिसरामध्ये गेल्या काही महिन्यापासून जबरी चोरी, बतावणी व दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर घटनांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन आरोपींचा शोध घेऊन पायबंद घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान बोळींज- आगाशी रोड येथील गोकुळ गॅलेक्सी येथे राहणाऱ्या गंगाबाई यशवंत गोरीवले (८०) या वृद्ध महिलेची २९ एप्रिलला संध्याकाळी सहाच्या सुमारास गोकुळ टाऊनशिप येथील सोसायटीच्या आवारातील कट्ट्यावर एकट्या बसल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून ते पळून गेले होते. अर्नाळा पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदाराकडून माहिती प्राप्त करून आरोपी शाहिद अब्दुल सतार कापडिया (३३) याला गुजरातच्या वापी येथून शनिवारी ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केल्यावर गुन्ह्यात वापरलेले २० हजार रुपये किंमतीचे वाहन हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीकडून अर्नाळा, तुळींज, विरार येथील तीन गुन्हे उघडकीस आणले असून काशीमिरा व विलेपार्ले येथे असेच गुन्हे केल्याचे दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.