जालना : फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीसह दोन महिलांविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या मुलीची चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. मुलीवर जबरी अत्याचार करण्यात आले असून यामुळे तिला शारीरिक व मानसिक आघात बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जालना तालुक्यातील सुंदरनगर भागात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलींचे १३ नोव्हेंबर रोजी दुपारी अपहरण झाले होते. या प्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चौकशीत मुलीचे अपहरण तिच्या घराजवळ राहणाऱ्या दोन महिला व एका व्यक्तीने केल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी त्या दोन महिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. महिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या मुलीचे अपहरण केल्याची कबुली देत तिला दत्ता धनगर याच्याकडे सेनगाव (जि.हिंगोली) येथे एका शेतवस्तीवर ठेवल्याचं सांगितले.
पथकाने तात्काळ सेनगाव येथील शेतवस्तीवर कारवाई करून त्या मुलीची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली. तसेच दत्ता धनगर याला जेरबंद करण्यात आले. पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि शामसुंदर कौठाळे, दामिनी पथक प्रमुख पोउपनि पल्लवी जाधव यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्या मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, सुनिल इंगळे, सपोफौ प्रविण कांबळे, अविनाश नरवडे, नंदलाल ठाकूर, अनिल काळे, श्रध्दा गायकवाड, कुसुम मगरे यांच्या पथकाने केली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे करीत आहेत.
भांडणाचा उचलला फायदापीडित मुलीचे कुटुंबातील सदस्यांशी भांडण झाले होते. याचाच लाभ दोन महिलांसह तिसऱ्या आरोपीने उचलला. तिची मानसिकता ओळखून तिला मनमाड येथे नेण्यात आले. नंतर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील शेतवस्तीवर नेऊन डांबून ठेवण्यात आले.
लग्न लावण्याचा होता डावपीडित मुलीला पळवून नेल्यानंतर शेतवस्तीवर ठेवण्यात आले होते. तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिच्या कुटुंबियांना जीवे मारून टाकू, अशी धमकी आरोपी तिला देत होता. तसेच दोन- तीन दिवसात त्या मुलीचे लग्न लावण्याची तयारी त्या आरोपींनी सुरू केल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.
रूग्णालयात उपचार सुरुतब्बल २३ दिवस आरोपीच्या ताब्यात असलेल्या मुलीवर अत्याचार झाल्याने तिची मानसिक, शारीरिक स्थिती बिघडली आहे. तिला जालना येथे आणल्यानंतर पोलिसांनी तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.