नालासोपारा - वालीव पोलीस ठाण्यामधील मुद्देमाल कारकून असलेल्या सहाय्यक फौजदाराला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याने जप्त केलेल्या मुद्देमालामधील करोडो रुपयांचे विदेशी सिगारेट चोरी करत विकल्याचा महाप्रताप केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपी पोलिसाविरोधात वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या असून त्याला वसई न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे. या अटक पोलिसाचे नाव शरीफ रमजान शेख असं आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डिसेंबर २०१८ रोजी पोलीस उपनिरीक्षक विनायक माने आणि त्यांच्या पथकाने ३ करोड २४ लाख रुपये किंमतीच्या विदेशी सिगारेट जप्त केल्या होत्या. हा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत मुद्देमाल टेम्पोसह जप्त करण्यात आला होता. टेम्पो मालकाने टेम्पो परत मिळावा म्हणून वसई न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी करून टेम्पो परत देण्याचे आदेश वालीव पोलिसांना दिल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा सदर टेम्पोमध्ये १५० गोण्यांमध्ये विदेशी सिगारेट होत्या. मात्र, टेम्पो परत देताना ५० गोण्याच सिगारेट आढळून आल्या. २ करोड १६ लाख रुपयांच्या १०० सिगारेटच्या गोण्या आढळून न आल्याने सर्वत्र खळबळ माजली. पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी बुधवारी गुन्हा दाखल करून मुद्देमाल कारकून सहाय्यक फौजदार शरीफ रमजान शेख याला अटक केले. वसई न्यायालयात हजर केल्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चोरीचा माल पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या चोरी प्रकरणामध्ये याचे कोणी साथीदार आहेत का ? वालीव पोलीस ठाण्यातील कोणी अधिकारी व कर्मचारी सामील आहे का याचा शोध घेत तपास वसईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. आश्विनी पाटील तपास करत आहे.
कुंपणच शेत खाते तेव्हा...पोलिसानेच विकल्या करोडो रुपयांच्या विदेशी सिगारेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 6:48 PM
वसई न्यायालयात हजर केल्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठळक मुद्देया अटक पोलिसाचे नाव शरीफ रमजान शेख असं आहे. पथकाने ३ करोड २४ लाख रुपये किंमतीच्या विदेशी सिगारेट जप्त केल्या होत्या. २ करोड १६ लाख रुपयांच्या १०० सिगारेटच्या गोण्या आढळून न आल्याने सर्वत्र खळबळ माजली.