नागपूर : येथील मुख्य रेल्वे स्थानकावर पकडण्यात आलेल्या गोल्ड स्मगलर्सचे कनेक्शन विदेशात असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. डीआरआय, एमझेडयूने या सोनेरी टोळीचा अत्यंत शिताफीने छडा लावत नागपूर, वाराणसी (यूपी) आणि मुंबईत छापेमारी करून ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १९ कोटी रुपये किंमतीचे तब्बल ३१.७ किलो सोने जप्त केले.
अत्यंत धाडसी अशा या कारवाईची माहिती आज उघड झाली. त्यानुसार, बांगला देशच्या सिमेवरून विविध प्रांतातील आरोपी सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मिळाली होती. ही गोल्ड स्मगलिंग रस्त्याने (कार, बस) आणि लोहमार्गाने (रेल्वे) केली जात असल्याचीही डीआरआयकडे माहिती होती. त्याआधारे डीआरआयने या सोनेरी टोळीवर नजर रोखली होती.
१२ ऑक्टोबरला हावडा - पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये सोन्याची तस्करी करणारे बसल्याचे कळताच डीआरआयच्या वेगवेगळ्या पथकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि रेल्वेचे सीआयबी तसेच आरपीफच्या मदतीने नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर १३ ऑक्टोबरला राहुल तसेच बलराम या दोघांना पकडले. त्यांच्याकडून साडेआठ किलो सोने (बिस्कीट) जप्त केले.
हे सोन्याचे बिस्किट ज्यांना दिले जाणार होते, त्या दोन सराफांनाही (रिसिव्हर) नंतर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून गोल्ड स्मगलिंग करणारांचे एक मोठे सिंडिकेटच समोर आले. त्यानंतर डीआरआयने १३ आणि १४ असे दोन दिवस नाट्यमय ऑपरेशन राबवले. एका पथकाने वाराणसी जवळच्या कारला जंगलात यूपी पोलिसांच्या मदतीने तब्बल तीन तास ऑपरेशन करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारमधून १८.२ किलो सोने जप्त करण्यात आले.
दरम्यान, पाच तस्कर मुंबईकडे मोठ्या प्रमाणात सोने घेऊन कारने जात असल्याचे कळल्यामुळे डीआरआयच्या पथकाने मुंबईकडेही असेच एक ऑपरेशन करून ५ तस्करांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून ४.९ किलो सोने जप्त करण्यात आले.
कारवाईचे स्वरूपशहर तस्कर जप्त केलेले सोनेनागपूर : ४ तस्कर साडेआठ किलो सोनेवाराणसी : २ तस्कर १८.२ किलो सोनेमुंबई : ५ तस्कर ४.९ किलो सोने
एकमेकांशी कनेक्टेडहे सर्व ११ ही तस्कर एकमेकांशी कनेक्टेड असून, त्यांची नावे जाहिर करण्यास डीआरआयच्या सूत्रांनी नकार दिला. त्यांच्याशी संबंधित कुरियर (खेप पोहचविणारे), रिसिव्हर, हॅण्डलर (ते स्विकारणारे) आणि तस्करीचे सोने विकत घेणारी एक मोठी चेन असून त्यांचा शोध घेतला जात आहे.