मुंबई - देशात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केले आहे. या मास्टर माईंडने रशियन अॅपच्या सहाय्याने परदेशी नागरिकांना लुटले असल्याची माहिती पोलिसांना दिल्याने एकच खळबळ माजली आहे. आयसीक्यु या अॅपच्या सहाय्याने हे चोरटे लुट करीत असल्याचे समोर आले आहे. याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या पूर्वी या गुन्ह्यात जुबेर सय्यद (वय - ३०), हसन शेख (वय - ४०), फईम शेख (वय - ३०), अबू बोकर (वय - ४५), मुकेश शर्मा (वय - ४५) या आरोपींना अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी ५१ स्वाईप मशिन, दोन लॅपटॉप, ६५ बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कार्ड बनवण्यासाठी लागणारे कार्ड रिडर आणि शेकडो धनादेश हस्तगत केले आहेत. फसवणूक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये अमेरिका आणि चीनच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. गुन्ह्यांची माहिती मिळाल्यानंतर मुख्य आरोपी मनोजकुमार परदेशात पळून गेला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान मलेशियातून मनोजकुमार चेन्नई विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने चेन्नई पोलिसांना मनोजबाबत कळवत त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला.
काय आहे आयसीक्यु अॅप?
आयसीक्यु हे अॅप असे आहे की, ते मोबाईलवरुन वापरल्यानंतर देखील तपास यंत्रणा या मोबाईलला अथवा अॅपला ट्रेस करु शकत नाहीत. तसेच कोणालाही पकडले तरी या अॅपबाबत तपास यंत्रणांना काही एक माहिती मिळणार नसल्याची यंत्रणा अॅपमध्ये कार्यन्वीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.