मुंबई - पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. तर, याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलचे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्रासह माजी अध्यक्ष वरियम सिंग कर्तार सिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तरतिघांकडील चौकशी पूर्ण झाल्याने वाधवा पिता-पुत्रासह वरियम सिंगच्या न्यायालयीन कोठडीची मागणी बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. निलंबित केलेला बँकेचा व्यवस्थापक जॉय थॉमसची कोठडी संपत असल्याने त्याला गुरुवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
या चौकडीच्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेच्या संचालकाकडे मोर्चा वळविला आहे. बुधवारी दुपारी संचालक मंडळातील माजी संचालक सुरजीत सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो बँकेच्या कर्ज समितीचा सदस्य आहे. चौकशीदरम्यान त्याचा यात सहभाग समोर येताच त्याला अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. अन्य संचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
अन्य संचालकांना लूक आऊट नोटीस जारी
पीएमसी बँकेच्या संशयाच्या भोवऱ्यातील अन्य संचालकांना देश सोडणे शक्य होऊ नये, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी त्यांना लूक आऊट नोटीस जारी केली.