पणजी: ड्रग्स माफियाशी संबंध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक या दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील तपासाच्या निष्कर्शावर ५० पानी अहवाल तयार केला आहे. नाईक पिता पुत्रांचा अंमली पदार्थ प्रकरणाशी संबंध असल्याचे पुरावे नसल्याचा उल्लेख या अहवालात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीकडून बनविण्यात आलेला ५० पानी अहवाल पुढील आठवड्यात सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यासंबंधी निर्णय होणार आहे. निरीक्षक एड्वीन कुलासो या तपास पथकाचे प्रमुख आहेत व त्यांनीच हा अहवाल बनविला आहे. विशेष सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. २००९ च्या सुमारास राज्यात ड्रग माफिया, पोलीस आणि राजकारणी यांच्या कथित संबंधावरून वातावरण बरेच तापले होते. विधानसभेतही हा मुद्दा ताणून धरताना त्यावेळी विरोधात असलेले विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनतापक्षाच्या विधीमंडळ सदस्यांनी नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. तसेच २०१२ मध्ये भाजप सत्तेवर येताच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती नियुक्त केली होती. या समितीने केलेल्या अहवालात रवी नाईक व रॉय नाईक यांच्यावर ठपका ठेवला होता, परंतु अहवालावर सभागृह समितीचे इतर दोन्ही सदस्यांनी म्हणजेच मायकल लोबो आणि विष्णू वाघ यांनी स्वाक्षरी केली नव्हती. राज्य सरकारकडून या प्रकरणात तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त केली होती. एसआयटीकडून करण्यात आलेल्या तपासात दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली.
ड्रग्स प्रकरणी गोव्याचे माजी गृहमंत्री आणि त्यांच्या मुलाला क्लीन चीट; एसआयटीच्या अहवालात खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 7:29 PM