मुंबई - १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ४६ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली. त पाच जणांना विशेष सेवेसाठी आणि ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त पाटील यांचा समावेश झाला आहे. त्यांचे पोलीस प्रशासनाकडून अभिनंदन होत आहे. आर. आर. पाटील यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता यापूर्वी २००६ मध्ये राष्ट्रपतींचे पोलीस पदक तसेच पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. पाटील यांनी शांतीनिकेतन महाविद्यालय सांगली येवून शास्त्र शाखेची पदवी घेतली. त्यानंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन १९८७ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. आतापर्यंत मुंबई, कोडोली, जयसिंगपुर, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्या ३२ वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये त्यांना ६४२ बक्षीसे मिळाली आहेत.महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे सहाय्यक कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात येणार्या उत्कृष्ट गुन्ह्यांच्या तपास पदकांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. देशातील विविध तपास यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या 96 जणांना हे विशेष पदक देण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील दोन महिला अधिकार्यांसह 11 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपअधिक्षक प्रकाश अमृतकर यांच्यासह मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुषाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर आणि सुधाकर देशमुख तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन माने यांच्यासह महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि प्रियांका शेळके यांना देखील विशेष पदक जाहीर करण्यात आले आहेत. तसेच अन्य राज्यांसह राज्य व केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा समावेश आहे.