राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून समाज भवन इमारत दोघांच्या नावाने करून ती एका महिलेला २४ लाखात विकली. मात्र विक्री करताना शासकीय जमीनीची चतूर्सिमा विकलेल्या इमारती जागेला दाखवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ, प्रितेश रोटकर, विनय महालकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण भोर हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. तीनही आरोपी अटक असून ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.
कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत आगरी समाजाचे मिळकत क्रमांक ३३ मध्ये समाज भवन इमारत आहे. समाजाचे व्यक्तीची समिती या समाज भवन साठी बनविण्यात आलेली आहे. असे असताना प्रीतेश रोटकर, विनय महालकर यांना ग्रामपंचायतीकडे मिळकत ३३ ही नावावर करण्यासाठी प्रशांत मिसाळ यांनी अर्ज करण्यास सांगितला होता. त्यानुसार दोघांनी कमिटीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायतीकडे अर्ज करून मिसाळ यांनी ठराव पास करून मिळकत रोटकर आणि महालकर यांच्या नावे केली. मात्र याची कोणतीही कुणकुण समाजाच्या कमिटीला नव्हती.
मिळकत नावावर केल्यानंतर उल्हासनगर येथील संजीवनी भगत यांना ही मिळकत २४ लाखाला विकली. त्यावेळी कोर्लई ग्रामपंचायत हद्दीबाहेर असलेली शासकीय जमीन गट क्र ८९ हिच्या चतु:सीमा असताना त्या मिळकत क्रमांक ३३ च्या सीमा असल्याचे सांगून बनावट खरेदी खतात नमूद केले. प्रशांत मिसाळ यांनी हे माहीत असताना शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केली. विशेष म्हणजे ही माहिती समितीला कळल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला तेव्हा पुन्हा मिळकत क्र ३३ ही पुर्वरत होती त्या नावावर केली. मात्र ज्या महिलेने खरेदी केली तिने आपली फसवणूक झाल्याचे समजताच ग्रामपंचायतीकडे अर्ज केला.
शासकीय जमीन फसवणुकीबाबत मंडळ अधिकारी वीना कोरगावकर यांनी रेवदंडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण भोर यांच्याकडे देण्यात आला. आरोपी विरोधात भा. द वी कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितेश रोटकर, विनय महालकर यांना ५ सप्टेंबर तर प्रशांत मिसाळ याने ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपींना मुरुड न्यायालयात हजर केले असता तींघानाही ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मालमत्ता खरेदी केलेल्या संजीवनी भगत यांनाही आरोपी केले असून त्यांनी अटक पूर्व जामीन घेतला आहे. प्रशांत मिसाळ यांच्यावर याआधी दोन गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात जामिनावर होते.