वसई- वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील वाडकर यांना मंगळवारी पहाटे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत असे एमबीबीएस चे पदवी प्रमाणपत्र नसल्याचे तपासात आढळून आल्यानंतर थेट वाडकर यांना त्यांच्या हायवे वरील रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर मधून ताब्यात घेण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणी डॉ वाडकर यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम 1961 चे कलम 33 तसेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 419 व 420 अनव्ये विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान डॉ.सुनील वाडकर यास अटक केल्यानंतर वसई कोर्टात हजर करण्यात आले असता त्यास (दि 17 डिसेंबर) पर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे डॉ.वाडकर हे यापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी म्हणुन शहरात तब्बल पाच वर्षे कार्यरत होते आणि अजून एक आश्चर्य म्हणजे पालिकेच्या सेवेतून बाहेर पडल्यावर त्यांनी विरार महामार्गा (हायवे )आणि नालासोपारा शहरात दोन खाजगी रुग्णालय काढली व ती आजतागायत चालवत आहेत.
परिणामी विरार येथील रुग्णालयाला देखील परवानगी नव्हती तर मध्यतरी वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे डॉ वाडकर यांची पदवी बोगस असल्याची लेखी तक्रार दाखल होताच पोलिस आयुक्तांनी तात्काळ हा तपास गुन्हे शाखेकडे दिला आणि अखेर डॉ वाडकर यांची तालूका वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकासोबत पोलिसांनी त्यांची वैद्यकीय पदवी व संबंधित कागदपत्रे यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ फारसे काही आढळून आले नाही किंबहुना डॉक्टरची पदवीच बोगस निघाल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी रात्री गुन्हे शाखेच्या वतीनं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने ही कारवाई करत डॉ वाडकर याला रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्येच अटक केली. आता विरार पोलीस या डॉक्टरची पदवी खरी आहे की खोटी याचा सखोल तपास करत आहेत. घडल्या प्रकाराने वसईत वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. तर अशा बोगस पदवी धारण करून महापालिका प्रशासनात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या डॉक्टरची पदवी कोणत्या अधिकाऱ्यांनी तपासली आता हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
-या डॉक्टर वर गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबत महापालिका वैद्यकीय प्रशासनास काहीही माहिती नाही.-भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी,वसई विरार शहर महानगरपालिका