कोरोनाग्रस्त माजी खासदाराचा मृत्यू, मृतदेह मिळविण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:40 PM2021-05-03T21:40:14+5:302021-05-03T21:42:08+5:30
Due to Corona Ex MP Died : तब्येत लक्षणीय बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
नवी दिल्ली - बिहारचे बाहुबली नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे शनिवारी कोरोनामध्ये संसर्ग झाल्यामुळे निधन झाले. शहाबुद्दीन तिहार तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. ते बिहारमधील सिवानमधील आरजेडीचे माजी खासदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतलीआणि शहाबुद्दीनचा मृतदेह बिहारला नेण्याची मागणी केली, परंतु सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने कुटुंबीयांना तसे करण्यास परवानगी दिली नाही. कोविड प्रोटोकॉलअंतर्गत शहाबुद्दीनच्या पार्थिवाला दिल्लीत दफन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने तुरूंग प्रशासनाला दिले आहेत. सोमवारी शहाबुद्दीन यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्याचा मृतदेह मंगोलपुरी कब्रस्तानात दफन केला जाईल.
तिहार कारागृह क्रमांक दोनमध्ये बंदिस्त असलेल्या शहाबुद्दीनवर यापूर्वी तुरूंग परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी हरी नगर येथील दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे सतत अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
कोरोना संसर्ग झाल्याची बातमी होती
शहाबुद्दीनची प्रकृती बिघडल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट केली गेली. 21 एप्रिल रोजी त्याच्या अहवालात, त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत लक्षणीय बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
निष्काळजीपणाचा आरोप
दिल्लीत आरजेडीचे माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या मृत्यूबद्दल कुटुंबीयांनी जेल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही शहाबुद्दीनशी योग्य वागणूक दिली नाही असे म्हटले आहे. आता बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून शहाबुद्दीन यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मांझी यांच्या हिंदुस्थानी अवामा मोर्चा पक्षाने केली आहे.