मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांचा पगार या महिन्यापासून रोखण्यात आला आहे. काही दिवसांनी परमबीर सिंग यांना निलंबित करण्याची तयारी सुरु आहे. ठाणे, मुंबई गुन्हे शाखेकडे त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याविरोधात अदखलपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता परमबीर सिंग यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते असं तपास अधिकारी रमेश महाले यांनी सांगितले.
परमबीर सिंग नेपाळमार्गे बेल्जिअमला गेल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) यांनी केला आहे. याबाबत रमेश महाले म्हणाले की, जर हा दावा खरा ठरला तर परमबीर सिंग यांच्या बेल्जिअम येथील पत्त्यावर नोटीस पाठवली जाऊ शकते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ५ आरोपींना पाकिस्तानच्या पत्त्यावर नोटीस पाठवली होती. इंटरपोलच्या माध्यमातून ही नोटीस पाठवण्यात आली. परंतु पाकने आम्हाला काहीच मदत केली नाही. दाऊद, राजन यांनाही परदेशात वॉरंट पाठवलं होतं.
इंटरपोलची भारतात नोडल एजन्सी म्हणून CBI काम करते. जर परमबीर सिंग हे बेल्जिअममध्ये असतील तर त्यांच्या पत्त्यावर नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सीबीआयला परमबीर सिंग यांच्याशी निगडीत कागदपत्रे सोपवतील. परमबीर सिंग यांच्याविरोधातील FIR आणि कोर्टाची अदखलपात्र वॉरंट सोपवलं जाईल. CBI ला ही कागदपत्रे सोपवल्यानंतर त्याचे बेल्जिअमच्या मूळ भाषेत अनुवाद करण्यात येईल. त्यानंतर ही कागदपत्रे सरकारकडून त्याठिकाणच्या पोलिसांना पाठवण्यात येतील.
मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया
CRPC कलम ८१, ८२ नुसार जर कुणी आरोपी सापडत नसेल किंवा आरोपी अटकेपासून पळत असेल तर अशावेळी त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. परंतु यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. पोलीस आरोपीच्या घरावर वॉरंट चिटकवतं. परमबीर सिंग यांच्याकडे अनेक घरं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पत्त्यावर वॉरंट कॉपी पाठवली जाईल. त्याठिकाणी दरवाज्यावर ती लावण्यात येईल.
पोलीस या सगळ्याचा पंचनामा करतील. परमबीर सिंग हे मोठे प्रस्थ असल्याने त्यांच्याविरोधातील कारवाईची बातमी टीव्ही, ऑनलाईन आणि प्रिंट मीडियातही येईल. त्यामुळे ते जिथे कुठे असतील त्याठिकाणी ही बातमी पाहतील किंवा ऐकली असेल असं मानलं जाईल. महाराष्ट्र पोलीस निर्धारित तारखेनंतर कोर्टात अर्ज देईल. त्यात परमबीर सिंग यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी परवानगी मागेल.