जमीर काझी मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात नशीब अजमावलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक व माजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना पराभवाची चव चाखावयास मिळाली आहे. तर मुंबईचे माजी आयुक्त व केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांना मात्र आपला गड राखण्यात यश आले आहे.राज्य पोलीस दलात कर्तृत्वाची छाप पाडलेले हे तीन अधिकारी आपापल्या राज्यातील स्वत:च्या मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. यापैकी सत्यपाल सिंह यांना नरेंद्र मोदी यांच्या लाटेच्या जोरामुळे अत्यल्प मतांनी का होईना दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश करता आला आहे.मावळत्या लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविलेले सत्यपाल सिंह हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि १९८० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सेवानिवृत्तीला काही महिन्यांचा अवधी असताना त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर प्रदेशातील बागपत या मतदारसंघातून निवडणूक लढविताना त्यांनी सपाचे गुलाम महमद व राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्या वेळी तिसºया स्थानावर राहिलेल्या अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्याशी या वेळी त्यांची अटीतटीची लढत झाली. सपाने पाठिंबा दिलेले चौधरी सुरुवातीच्या काही फेऱ्यांत आघाडीवर होते. मात्र अखेर सत्यपाल २३,५०२ मतांनी विजयी झाले. त्यांना ५,२५,७८९ इतकी तर चौधरी यांना ५,०२,२८७ इतकी मते मिळाली.सत्यपाल सिंह यांनी ज्यांच्याकडून मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्या अरुप पटनायक यांनीही खासदार होण्यासाठी निकराची झुंज दिली. मात्र त्यांना सत्यपाल सिह यांच्यासारखी किमया करता आली नाही. १९७९च्या बॅचचे आयपीएस असलेल्या पटनायक यांनी ३ महिन्यांपूर्वी ओडीसातील बिजू जनता दलात प्रवेश केला होता. त्यांनी भुवनेश्वरमधून निवडणूक लढविताना निवृत्त आयएएस अधिकारी भाजपच्या अपराजिता सारंगी यांच्याकडून २३,८३९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. दोघांना अनुक्रमे ४,६३,१५२ व ४,८६,९७१ इतकी मते पडली.तर माजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचेही लोकसभाप्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. १९९०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले लक्ष्मीनारायण यांनी दीड वर्षापूर्वी आठ वर्षांची सेवा बाकी असताना बदल्यातील ‘राजकारणाला’ कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामाजिक कार्याची आवड असलेल्या लक्ष्मीनारायण यांनी आंध्र प्रदेशमधील जनसेवा पार्टीच्या वतीने विशाखापट्टणम येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण २३.७ टक्के म्हणजे २,८८,८७४ मते मिळवीत तिसऱ्या स्थानी फेकले गेले. युवाजन श्रमिक ऋतू कॉँग्रेस पार्टीच्या एम.व्ही.व्ही. सत्यनारायण यांनी चुरशीच्या लढतीत तेलगू देशमच्या भारत भातुकुमली यांचा अवघ्या ४ हजार ४१४ मतांनी पराभव केला. लक्ष्मीनारायण यांना मिळालेली मते त्यांना फायद्याची ठरली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गड राखला, तर दोन अधिकारी झाले पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:28 PM
मुंबईचे माजी आयुक्त व केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांना मात्र आपला गड राखण्यात यश आले आहे.
ठळक मुद्देमाजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचेही लोकसभाप्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. अरुप पटनायक यांनीही खासदार होण्यासाठी निकराची झुंज दिली. सामाजिक कार्याची आवड असलेल्या लक्ष्मीनारायण यांनी आंध्र प्रदेशमधील जनसेवा पार्टीच्या वतीने विशाखापट्टणम येथून निवडणुकीच्या रिंगणात होते.