औरंगाबाद : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शहर व परिसरातील जवळपास २ ते ३ हजार नागरिकांना गरिमा रिअल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करायला लावून सुमारे ८ ते १0 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने राजस्थानच्या धौलपूरचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाहला आज बुधवारी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला ७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कुशवाहने गरिमा या चिटफंड कंपनीच्या माध्यमातून देशभरातील गुंतवणूक दारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा गोळा केल्या होत्या. त्यासाठी त्याने विविध शहरांत कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. साखळी पद्धतीने त्याने कंपनीचे जाळे पसरविले होते़ त्याच्या आमिषाला छोटे-मोठे अनेक गुंतवणूकदार बळी पडले होते. प्रथम काही वर्षे कंपनीने गुंतवणूकदारांना योग्य परतावा दिला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारांना गरिमामध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला. दरम्यान, ही कंपनी गतवर्षी अचानक बंद पडल्यामुळे गुंतवणूक दारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याप्रकरणी अशोक कु-हे यांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर ३४९ गुंतवणुकदारांनी त्यांची फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले आणि कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. या कंपनीचा संस्थापक संचालक बनवारीलाल कुशवाह हा धौलपूरच्या कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, कर्मचारी दादासाहेब झारगड, महेश उगले, योगेश तळवंदे, कडुबा पुंगळे आणि सचिन संपाळ यांचे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपूर्वी राजस्थानला गेले होते. तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी धौलपूरच्या कारागृहातून आरोपी कुशवाहला ताब्यात घेऊन बुधवारी दुपारी औरंगाबादेत आणले.
औरंगाबादच्या न्यायालयाचे वॉरंट नाही मान्य केलेआरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक औरंगाबादच्या कोर्टाचे अटक वॉरंट घेऊन जेलमध्ये गेले. मात्र, त्या वॉरंटवर आरोपीला ताब्यात देण्यास कारागृह प्रशासनाने नकार दिला. त्यानंतर धौलपूर येथील न्यायालयाकडून पोलिसांनी स्वतंत्र वॉरंट मिळवून त्याआधारे आरोपीला ताब्यात घेऊन औरंगाबादला आणले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.