उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरा, सासू आणि दोन दिरांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत राहणाऱ्या करिश्माचं लग्न खेडा चौगनपूर येथील विकाससोबत 4 डिसेंबर 2022 रोजी झालं होतं. करिश्माचा भाऊ दीपक सांगतो की, लग्नात 11 लाख रुपये, कार आणि सोन्यासह इतर मौल्यवान वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. असे असूनही सासरचे लोक खूश नव्हते. त्यांची फॉर्च्यूनर कार आणि 21 लाख रुपयांची मागणी होती. याच दरम्यान, करिश्माने एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे सासरच्यांनी तिला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली.
करिश्माच्या कुटुंबीयांनी अनेकदा गावात येऊन समाजातील लोकांना बोलावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच करिश्माच्या सासरच्या मंडळींना 10 लाख रुपये देण्यात आले, मात्र त्यांची हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही. दीपकने आरोप केला आहे की, 29 मार्च रोजी तिने मोठ्या बहिणीला फोन करून पती, सासू, सासरे, दिर यांनी मारहाण केल्याचं सांगितलं. दीपक आणि त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा करिश्माची हत्या तिच्या सासरच्या मंडळींनी केल्याचं समजलं
दीपकने लवकरात लवकर करिश्माचा पती विकास, सासरा सोम पाल भाटी, सासू राकेश, नणंद रिंकी आणि दिर सुनिल, अनिल यांच्याविरुद्ध इकोटेक येथे हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दीपकच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पती विकास आणि सासरा सोमपाल भाटी यांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.