नाशिक : मुळ अफगाणिस्तानाचे रहिवाशी असलेले मुस्लीम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८,हल्ली मुक्काम मिरगाव, सिन्नर) यांचा पंधरवड्यापुर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यानंतर संपुर्ण जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. नाशिक ग्रामिण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत चौघा संशयितांना बदलापुरमुधून बेड्या ठोकल्या आहे.
जरीफ चिश्ती बाबा हे अफगानी निर्वासित नागरिक म्हणून भारतात वास्तव्यास होते. ते मागील दोन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मीरगाव शिवारातील बंगल्यात भाडेतत्वावर राहत होते. यु-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर या सोशलमिडियाच्या माध्यमातून जरीफ बाबा हे प्रसिद्ध झाले होते. युट्युबर जरीफ बाबांनी सोशलमिडियाद्वारे मोठा चाहता वर्ग जोडला होता. तत्वज्ञान, अध्यात्माच्या गाेष्टी व सुफी विचारधारेबाबत ते विविध प्रकारचे व्हीडिओ त्यांच्या युट्युब, फेसबुक, ट्वीटवर पोस्ट करत होते. त्यास लाखोंच्या संख्येने पसंती मिळत होती. त्यामुळे यु-ट्युबकडून त्यांना रक्कम दिली जात होती. तसेच काही देणगीही त्यांना मिळत होती. यामाध्यमातून त्यांनी दोन ते तीन कोटी रुपयांची मालमत्ता भारतात जमविली होती. निर्वासित असल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार हे जवळचे विश्वासु सेवेकरी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या नावांवर करण्यात आले होते. या सेवेकऱ्यांपैकी चौघांनी मिळून त्यांच्या हत्येचा मालमत्तेच्या हव्यासापोटी कट रचला व तो तडीस नेला, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांच्या तीन पथकांनी सलग पंधरा दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत शोध घेत लोणावळ्याजवळील बदलापूर येथे दडून बसलेल्या चौघा संशयितांच्या मुसक्या बांधल्या. यामध्ये गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड-पाटील (२८,रा.लोणी, ता.रहाता, जि.अहमदनगर), बाबाचा कारचालक रविंद्र चांगदेव तोरे (२५,रा.काेळपेवाडी, ता.कोपरगाव), पवन पोपट आहेर (२६,रा.विठ्ठलनगर, येवला, नाशिक) आणि गफार अहमद खान या चौघा संशयितांचा समावेश आहे. या चौघांच्या दोन साथीदार फरार असून त्यांच्या मागावर पथके रवाना करण्यात आल्याचे सचिन पाटील म्हणाले.