मुंबई - चित्रपट निर्मात्याकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अंबोली पोलिसांनी दोन कथित पत्रकारांसह चौघांना अटक केली. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. तक्रारदार निर्मात्याच्या वयोवृद्ध पित्याचा आरोपी महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. त्यावेळी पाच लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारताना अंबोली पोलिसांनी आरोपींनी सापळा रचून अटक केली.
ऑनलाईन न्यूज पोर्टलचा मालक हुसेन मकरानी (36), न्यूज पोर्टलचा प्रमुख युवराज चौहान (32) यांच्यासह रेहमान अब्दुल शेख (45) व लकी मिश्रा (32) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय तक्रारदार निर्मात्याच्या वडिलांना पार्किनसनचा आजार होता. त्यांना मसाज करण्यासाठी मसाज थेरपिस्ट म्हणून लकी मिश्रा तक्रारदाराच्या घरी गेली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ती निर्मात्याच्या घरी येऊन त्याच्या वडिलांना मसाज देत होती. दरम्यान, जानेवारी महिन्यात तक्रारदाराच्या वडिलांना खंडणीसाठी आरोपींकडून दूरध्वनी आला होता. त्यांनी आरोपींकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आरोपींनी निर्मात्याला दूरध्वनी करून वडिलांचा व्हिडीओ पाहण्यासाठी बोलावले. त्यानुसार आरोपींनी निर्मात्याला पित्याचा मोर्फ व्हिडीओ दाखवला आणि ही बातमी न दाखवण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर निर्मात्याने याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अंधेरीतील लोखंडवाला परिसरात अंबोली पोलिसांनी सापळा रचून पाच लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले.