नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी पावणे येथील राज्यभरात चालणारे जुने वैद्यकीय हातमोजे विक्री प्रकरणाचे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणी प्र्रशांत सुर्वे, विपुल शहा, अफरुज शेख, इम्रान या चौघांना अटक करण्यात आली असून तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल ३८ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांना पावणे येथील एका ठिकाणाची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी पथकाने छापा टाकला होता. यावेळी एकाला अटक केल्यानंतर मिळत गेलेल्या माहितीच्या आधारे भिवंडी व औरंगाबाद येथेदेखील पथकाने छापे टाकले. यानुसार तीन ठिकाणच्या छाप्यात तब्बल ३८ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. तर, औरंगाबाद येथून एकाला, भिवंडीमधून दोघांना तर पावणेमधून एकाला अटक करण्यात आली आहे.
जुन्या हातमोज्यांचा औरंगाबाद व भिवंडी येथे मोठ्या प्रमाणात साठा केल्यानंतर त्या ठिकाणावरून नवी मुंबईत पावणे तसेच इतर ठिकाणी धुऊन पॅकिंग करण्यासाठी पाठवले जात होते. त्याचा सुगावा नवी मुंबई पोलिसांना लागताच हे रॅकेट उघडकीस आले. सर्वजण केवळ ठरावीक कामापुरते मर्यादित होते. त्यामुळे या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु या टोळीने राज्यभरात तसेच केरळ व पंजाब येथेही अशाच प्रकारे जुन्या हातमोज्यांच्या विक्रीचे रॅकेट सक्रिय केल्याची दाट शक्यता आहे.या पथकाची कामगिरीगुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम, सहायक निरीक्षक राहुल राख, रूपेश नाईक, सहायक निरीक्षक भगवान तायडे, राजेंद्र थोरात, हवालदार रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण, राहुल केळगद्रे, धनाजी भांगरे, शशिकांत जगदाळे, संतोष मिसाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.