धुळे :
गुन्हा करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणाऱ्या चार जणांना धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी पकडले. ही कारवाई कुसुंबा ते मालेगाव रोडवर करण्यात आली. ६ हजार रुपये किंमतीच्या ४ तलवारी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत.
अवैधरित्या तलवारी बाळगून चार जण कुसुंबाकडून मालेगावच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार, शोध पथकाला तात्काळ पाठवून कुसुंबा गावानजिक सापळा लावण्यात आला. चार जणं येताच संशयावरुन त्यांना थांबविण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे ७ तलवारी मिळून आल्या. त्याची किंमत ६ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी विशाल नाना भील (वय २२, रा. अन्वरनाला, पिंप्री शिवार, ता धुळे), सुनील साहेबराव सोनवणे (वय २५, रा. एकलव्य नगर, अजनाळे रस्ता, सडगाव ता. धुळे), विकास प्रकाश मालचे (वय ३०, रा. अमृतनगर, अजनाळे रोड, सडगाव ता. धुळे), सुनील नागो भील (वय ३६, रा. सुभाष नगर, बाळापूर, ता. धुळे) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६ हजार रुपये किंमतीच्या ४ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील विंचुरकर, कर्मचारी प्रविण पाटील, अविनाश गहीवड, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, योगेश काेळी, मुकेश पवार यांच्या पथकाने कारवाई केली.