मुंबई : जळगावच्या साकळीमधून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी (२९) आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भैया लोधी (३२) यांच्या वाढीव पोलीस कोठडीला मंगळवारी विशेष सत्र न्यायालयाने नकार दिला. या दोघांसह गौरी लंकेश हत्याकांडातील ताब्यात घेतलेल्या सुजीत कुमार आणि भरत कुरणेचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.३ गावठी बॉम्ब, सीडी, तसेच अन्य दस्ताऐवजांसह लोधी आणि सूर्यवंशीला एटीएसने बेड्या ठोकल्या होत्या. अटक हिंदुत्ववाद्यांच्या कटात दोघेही सहभागी होते. त्यांनी गुन्ह्यांसाठी वाहने चोरली, वाहन क्रमांक बदलले, तसेच एका दुचाकीची विल्हेवाटही लावली. ही दुचाकी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडादरम्यान वापरल्याचा संशयही एटीएसला होता.आरोपींनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. पोलीस कोठडीदरम्यानही त्यांनी याची प्रात्यक्षिके दाखविली. स्फोटकांप्रकरणी जप्त केलेले बॉम्ब बनविण्यात या दोघांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी एटीएसने दोघांच्या वाढीव कोठडीची मागणी केली, तर कुमार आणि कुरणेच्या वाढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. सूर्यवंशी आणि लोधीच्या वाढीव कोठडीला आरोपींच्या वकिलाने विरोध केला. आधीच्याच तपासाचे कारण देत, वाढीव पोलीस कोठडी देणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. एटीएस त्यांची बाजू मांडू शकले नाही. तपासात प्रगती दिसत नसल्याचे सांगून, न्यायालयाने या दोघांसह कुमार आणि कुरणेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
नालासोपारा स्फोटक प्रकरणातील चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 6:50 AM