मुंबई: विक्रोळी टागोरनगरमधील मुंबई महापालिकेच्या शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. टागोरनगरमधील पालिकेच्या मुंबई पब्लिक हायस्कूल या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरीत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनीचां लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांनी या शिक्षकाला विक्रोळी पोलीस ठाण्यात नेले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
सदर प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घटलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. विक्रोळीच्या पालिका शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली.
चित्रा वाघ यांनी पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, सदर शिक्षकावर कार्यवाही होणारच, परंतु या शिक्षकाची कुठलीही माहिती न घेता नियुक्ती करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांवर देखील तपासात जर तसं निष्पन्न झालं तर कार्यवाही केली जाईल. यासोबतच भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत, यासाठी पालिका प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
शिक्षा देण्याच्या नावाखाली हा पीटी शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. लैंगिक छळाचा आरोप असलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी असे कृत्य करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या शिक्षकाने ठाण्यातही असा अत्याचार केल्याची कबुली देखील केल्याची माहिती समोर येत आहे.