नाशिक : पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी राखीव वनात अवैधरित्या घुसखोरी करत रानडुकरांची शिकार करणाऱ्या चौघा शिकाऱ्यांना वन विभागाच्या सतर्क गस्तीपथकाने सापळा रचून अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने संशयितांना शनिवारपर्यंत (29) वन कोठडी सुनावली आहे.
समृद्ध जैवविविधतेचे माहेरघर असलेल्या अंजनेरी राखीव वनाकडे शिकाऱ्यांनी पुन्हा वक्रदृष्टी केली आहे. येथील रान ससे, रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी वाघरू सारखे जाळे लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंजनेरी नियतक्षेत्रातील तळवाडे भागात वाघरू लावून वन्यजीवांची शिकार करण्याचा प्रयत्न सुरु असताना वनविभागाच्या गस्ती पथकाने संशयित विठ्ठल मंगळु भुरभुडे (३४), रामा गणपत लोखे (४८), रामदार गोविंद सराईत (४५, सर्व रा. अंधारवाडी) आणि सोमो भिवा पारधी (४५ रा. काचुर्ली) या चौघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शिकारीच्या साहित्यासह गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल सुजित बोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांविरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शनिवारपर्यंत संशयितांची चौकशी केली जाणार आहे.