मुंबई : संयुक्त अरब अमिरातीतून मुंबईत अवैधरीत्या सोने घेऊन येणाऱ्या पाच प्रवाशांना सीमाशुल्क विभागाने नुकतीच अटक केली. या दोन वेगवेगळ्या कारवायांत चार किलो सोने जप्त करण्यात आले असून, त्याचे बाजारमूल्य दीड कोटींहून अधिक आहे.
सीमाशुल्क विभागाच्या मुंबई एअर इंटिलिजन्स युनिटने ही कारवाई केली. संयुक्त अरब अमिरातीतून मुंबईत दाखल झालेल्या चार प्रवाशांची तपासणी केली असता त्यांनी अवैधरीत्या सोने भारतात आणल्याचे निदर्शनास आले. त्यातील दोघे शारजहाहून जी९-४०१ या विमानाने, तर दोघे अबुधाबीहून ईवाय-२०६ या विमानाने मुंबईत दाखल झाले होते. मेटल डिटेक्टरमध्ये सोने दिसू नये, यासाठी त्यांनी ते भुकटीच्या स्वरुपात आणले होते. चारही प्रवाशांकडून एकूण ३.६ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. त्याचे बाजारमूल्य १.५६ कोटी रुपये इतके आहे. संबंधित प्रवाशांना सीमशुल्क कायदा १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या कारवाईत दुबईहून आलेल्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी तिने सोने अंतर्वस्रात लपवून आणले होते. मात्र, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचा डाव हाणून पाडला. तिच्याकडून ५४६ ग्रॅम सोने आणि ८६८ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे. त्याचे बाजारमूल्य ३८ लाख इतके आहे. संबंधित महिलेवर सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.