देवळा : येथील देवळा -नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर आज शुक्रवारी सायंकाळी इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा ) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच तर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचुर झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर येथील ढेबुड मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चौघे जण पिंपळगाव (वा.) येथून दुचाकीने ( क्र.एमएच ४१ के ५६६१) शेतीच्या कामावरून घराकडे परतत होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान देवळा -नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोरून भावडबारी घाटाच्या दिशेने जात असताना नाशिककडून येणाऱ्या इर्टीगा कारने ( क्र.एमएच ४३ एएल ३००९) दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे ( - वय ४२ ), मंगलबाई गोपीनाथ हिरे (-वय ३५) या पती-पत्नीसह मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय १६) हे जागीच ठार झाले तर मुलगी जागृती गोपीनाथ हिरे ( वय १८) हि गंभीर जखमी झाल्याने तिला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची अत्यवस्थ परीस्थिती पाहून तिला मालेगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असता मालेगाव येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येवून त्यांचे वर रामेश्वर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबत देवळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गोपीनाथ हिरे हे पिंपळगाव ( वा ) येथे वाट्याने शेती करत होते. तेथे त्यांनी कांदा लागवड केलेली होती. हे सर्व कुटुंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असतांना काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.