पुणे: अल्पवयीन चार मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी माजी आयएएस अधिकारी मारुती सावंत याला पाच वर्षे कारावास आणि सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (अ) नुसार सावंत याला न्यायालयाने दोषी ठरविले. दंड न भरल्यास पंधरा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालपत्रात नमूद केले आहे. विशेष न्यायाधीश श्रीप्रदा पोंक्षे यांनी हा निकाल दिला.
अधिक माहितीनुसार, शाळेत मुलींच्या समुपदेशनातून वरील प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात मार्च २०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व तीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणात मारुती सावंत याच्यावर बलात्कार, विनयभंग, बालकांचे संरक्षण कायदा (पॉस्को), अनुसूचित जाती -जमातींवरील अन्याय- अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॅसिटी) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी) आदी कलमांनुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याकाळी कृषी खात्यात वरिष्ठ अधिकारी असलेल्या मारुती सावंत यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारने सावंत यांना निलंबित केले होते. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते व पोलीस हवालदार राजेंद्र गिरमे यांनी केला.
आरोपीविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी बलात्कार, धमकावणे, पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीला निर्दोष सोडले हाेते. मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या कलमानुसार आरोपीला शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारतर्फे वकील प्रताप परदेशी यांनी एकूण १४ साक्षीदार तपासले.
कोण आहे मारुती सावंत?
मारुती सावंत हे १९९८ च्या बँचचे बढती मिळालेले आयएएस अधिकारी आहेत. त्यावेळी ते महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अँग्रीकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च या विभागात महासंचालक पदावर कार्यरत होते.
शाळेच्या समुपदेशनातून प्रकार उघडकीस
शाळेत मुलींच्या समुपदेशनासाठी महिला समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मुलींशी संवाद साधताना हा प्रकार उघडकीस आला होता. चॉकलेट खाण्यास देण्याच्या आमिषाने आरोपी मारुती सावंत हा मुलींना त्यांच्या फ्लँटवर बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत होता. त्यांना संगणकावर अश्लील फिल्म, फोटो दाखवल्याचे मुलींनी समुपदेशकांना सांगितले होते. तीन वर्षांपासून एका मुलीसोबत आरोपीने शारीरिक संबंध ठेवले होते. ही बाब कळताच पीडित मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापिकेने यासंदर्भात सिहंगड पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध तक्रार केली होती.