साखरखेर्डा (बुलढाणा) : उमणगाव येथील जीवन प्राधिकरणवरील पाणीपुरवठा शुद्धीकरण योजनेच्या चार मोटारींची चोरी झाल्याचा प्रकार गुरूवारी समोर आला आहे. अनेक वर्षापासून या योजनेंतर्गत पाणी पुरवठा बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी येथील मोटारपंपवरच हातसाफ केला. यामुळे राज्य जीवन प्राधिकरणचे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
ग्रामपंचायत उमनगाव येथे २००४ मध्ये राज्य जीवन प्राधिकरण संयुक्त पाणीपुरवठा योजना गोरेगाव आणि उमनगाव गावासाठी झाली होती. या योजनेद्वारे तीन ते चार वर्ष नियमित पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने ती योजना बंद पडली होती. त्याची देखभाल व दुरुस्ती कोणीही केली नाही. त्यामुळे ही योजना १५ वर्षापासून बंद अवस्थेत पडलेली आहे. या गावाला इतर पाणीपुरवठा योजनेकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बंद पडलेल्या योजनेचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी ७:५ एचपीच्या चार मोटार पंप चोरून नेले आहेत. ही बाबी लक्षात आल्यानंतर १ लाख ८० हजार रुपयाची चोरी झाल्याची तक्रार वनगाव येथील उपसरपंच गौतम गवई, माजी उपसरपंच सुरेश खिल्लारे, माजी सरपंच शांताराम गवई, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव खिल्लारे, माजी सरपंच मोहन गायकी, सुभाष भगत, महेंद्र खिल्लारे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली आहे. या चोरी झालेल्या मोटार पंपाचा शोध घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या जलशुद्धीकरण योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.