नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार (Rape) केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहडोल जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष कमल प्रताप सिंह यांनी याप्रकरणी विजय त्रिपाठीचं (Vijay Tripathi) नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. सोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारू पाजली आणि 18 तसेच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोरच गंभीर अवस्थेत फेकून निघून गेले. यानंतर पीडितेने 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत. विजय त्रिपाठीची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपाला गरज नाही. अशा गुन्ह्याचा आणि कृत्याचा भाजप तीव्र निषेध करते असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्येनंतर मृतदेह जाळला; 2 जणांना अटक
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोतिहारी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. भयंकर बाब म्हणजे हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोतिहारीतील कुंडवा चैनपुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला असून कारवाई होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी ही घटना ही घटना घडली. मोतिहारीच्या कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेपाळच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी दोन फेब्रुवारीला एफआयआर दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुंडवा चैनपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्कार आणि तिची हत्या केल्याचा आरोप केला. तक्रारीमध्ये चार जणांवर आरोप करण्यात आले आहेत. तर सात जणांवर मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली आहे.