मीरारोड - काशिमीरा येथील एका औषध कंपनीच्या मालका सोबत असलेल्या आर्थिक वादातून ती जाळणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने अटक केली आहे.
दहिसरच्या आनंद नगर भागात राहणारे जयंतीलाल वैष्णव यांची काशिमीरयाच्या दोढिया पेट्रोल पंप जवळ जयको केमीकल नावाने औषध कंपनी आहे. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास कंपनीत २५ कामगार काम करत असताना एका कार मधुन आलेल्या काही अनोळखी लोकांनी कुंपणाची जाळी उचकटुन आत प्रवेश केला. व तेथील ज्वलनशील केमीकल सांडून कापडाचे पेटते बोळे फेकले.
सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आणली. अन्यथा कंपनीतील केमीकल साठा पेटला असता तर मोठी हानी झाली असती. यात जीवीत हानी झाली नसली तरी आगी मुळे नुकसान झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कंपनीत घुसणारे दिसुन आले.
आकाश वैष्णव यांनी दिलेल्या फिर्यादी नंतर काशिमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर सह वेळे, वाडिले, जाधव, पोशिरकर, शिंदे, पाटील, गर्जे आदिंच्या पथकाने तपास करुन चौघांना अटक केली आहे.
यात सुत्रधार कमलेश महेश पारेख (४१ ) , लकीराज दाऊलाल राजपुत (२१), राहुल मुन्नालाल सातपुते (२४) व अक्षय यशवंत चव्हाण (२१) सर्व रा. बोरीवली यांचा आरोपीं मध्ये समावेश आहे. शुक्रवार पर्यंत सर्वांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
पारेख हा मुख्य आरोपी असुन तो गुंतवणुकदार आहे. त्याचे पैसे अडकले असल्याने वैष्णव सोबत वाद सुरु होता. त्या वादातुन कंपनी जाळण्याची सुपारी दिल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.